Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोघल हे राष्ट्रनिर्माते : नसिरूद्दीन शहा

मुंबई प्रतिनिधी | देशात २० कोटी मुस्लीम असून आम्ही घाबरणार नसून लढणार असल्याचे सांगतानाच मोघल हे राष्ट्रनिर्माते असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेते नसिरूद्दीन शहा यांनी केले आहे. द वायरला त्यांनी दिलेल्या मुलाखतीवरून आता उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

या संदर्भात वृत्त असे की छत्तीसगडच्या धर्म संसदेत काही साधूंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे प्रकरण तापले आहे. यावरून आज कालीचरण महाराजला अटक देखील करण्यात आली आहे. तर यावरून वादंग निर्माण झाले असून यात आता दिग्गज अभिनेते नसिरूद्दीन शहा यांनी उडी घेतली आहे. त्यांची द वायर या पोर्टलसाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेली मुलाखत चांगलीच गाजत आहे.

या मुलाखतीत शाह म्हणाले- मला आश्चर्य वाटतं की, या लोकांना ते काय बोलतायत हे तरी कळतं की नाही. कारण ते जे काही बोलण्याचं प्रयत्न करतायत ते एक फुल्ल स्केल नागरी युद्ध आहे. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही मुस्लिम २० कोटी आहोत.  आम्हा २० कोटी मुस्लिमांचा ह्याच देशावर दावा आहे, आम्हा २० कोटींसाठी हीच मातृभूमी आहे. आम्ही इथेच जन्मलोत. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. आणि मला खात्रीय, की जर कुणी असा मुस्लिमांविरोधात प्रयत्न केलाच तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल.

याप्रसंगी त्यांनी मोगलांचे कौतुक देखील केले. ते म्हणाले की, मोगलांनी केलेले अत्याचार पुन्हा पुन्हा हायलाईट केले जातात. पण त्यांचं राष्ट्रनिर्मितीतलं योगदान विसरलं जातं. मोघलांनीच ऐतिहासिक स्मारके निर्माण केली. गौरवशाली इतिहास त्यांनी दिला. संगीत, साहित्य, सांस्कृतिक, नृत्य, गायिकी, चित्रकला यांच्या परंपरा मुस्लिमांनी निर्माण केल्या. तैमूरबद्दल कुणी बोलत नाही, नादीर शाह बद्दलही कुणी बोलत नाही, गजनीही नाही कारण ते इतिहासाशी सुसंगत नाहीत. ते आले आणि लुटून गेले. पण मोघल ह्या देशात आले आणि त्यांनी ही भूमी त्यांची केली. त्यांना हवं तर तुम्ही रेफ्यूजी म्हणू शकता. आणि मुस्लिम शासकांनी केलेल्या अत्याचाराबाबत आज प्रत्येक मुसलमानाला जबाबदार धरणे हे हास्यास्पद असल्याचे नसिरूद्दीन शहा म्हणाले.

 

Exit mobile version