Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : हातभट्टी विक्रेती महिला ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबध्द

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | बेकायदा गावठी दारू विक्री करणार्‍या तालुक्यातील सांगवी येथील एका महिलेवर एम.पि.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी काढले असून महिलेविरूध्द झालेली तालुक्यातील पहिली कार्यवाही आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध गावठी हातभट्टीच्या दारू विक्री करणार्‍या इसमांवर ग्रामीण पोलिसांकडून वेळोवेळी कायदेशीर कार्यवाही करण्यात येते. परंतु ही दारू पिल्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे. तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यातच बेकायदेशीर दारूची विक्री करणार्‍यांवर पोलीस कारवाई करीत असताना देखील गुपित दारू विक्री सुरूच असते.

अशातच बेकायदेशीर दारूची विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी या हेतूने एम. राजकुमार (पोलीस अधीक्षक), रमेश चोपडे (अप्पर पोलीस अधीक्षक), अभयसिंह देशमुख (सहाय्यक पोलीस अधीक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोउपनि कुणाल चव्हाण, पोउपनि लोकेश पवार व ग्रामीण पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक हद्दीतील गावठी दारू विक्री करणार्‍यांविरुद्ध कंबर कसली आहे.

या अनुषंगाने, हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणार्‍या महिला नामे आक्काबाई सुरेश चव्हाण, (वय-४०) रा. सांगवी, ता. चाळीसगाव हिच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत ८ गुन्हे दाखल असून ३ वेळा प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. त्यामुळे तिचे विरूध्द एम.पि.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध करणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सादर करण्यात आला होता. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तिला स्थानबद्ध करणेबाबतचा आदेश नुकतेच पारित केले आहे. पोउपनि लोकेश पवार व पथक यांनी तिला ताब्यात घेऊन तिची रवानगी अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान महीले विरोधात करण्यात आलेली ही चाळीसगाव तालुक्यातील पहिली व जळगाव जिल्ह्यातील दुसरी कार्यवाही आहे. सदर कार्यवाहीमुळे गावठी हातभट्टीची दारू तयार व विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले असून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version