Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वांच्या सहकार्याने विकास केला- रक्षाताई खडसे

भुसावळ प्रतिनिधी । सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे आपल्या कार्यकाळात विविध विकासकामे करून विविधांगी योजनांना गती मिळाल्याचे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. त्या येथील डॉ. आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील मुख्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, मी खासदार बनल्यानंतर बाबांनी मला समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचा मंत्र दिला होता. आपण लोकांमध्ये गेले पाहिजे. त्यांची कामे केली पाहिजे ही शिकवण त्यांनी मला दिली. आजवर हीच शिकवण मी अंमलात आणली आहे. पहिल्यांदा एक महिला म्हणून आपल्याला खासदारकीचे काम झेपेल का? असा प्रश्‍न मनात उपस्थित होत होता. मात्र मला सर्वांचे सहकार्य लाभले. विशेष करून माझे बाबा एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्यासह पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यामुळे मी कामे करू शकली असे खासदार रक्षाताई म्हणाल्या.

रक्षाताई पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ…सबका विकास या घोषवाक्यानुसार कामे करण्याचे आम्हाला सुचविले. यासोबत त्यांनी विविध योजनांची जनतेपर्यंत माहिती पोहचवण्याचेही आम्हाला सांगितले होते. यानुसार, विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम आपण केल्याचे रक्षाताई म्हणाल्या. आता रेल्वेच्या उड्डाण पुलांसह अन्य विकासकामांचे उदघाटन झाले असून या माध्यमातून मतदारसंघातील जनतेसाठी विकास केल्याचा आपल्याला आनंद झाला असून सेवेची ही संधी पुन्हा मिळावी अशी अपेक्षादेखील खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version