जमिनी अधिग्रहीत केलेल्यांच्या मुलांना रेल्वेत नोकरीला घ्या : खा. खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील वाढीव रेल्वेलाईनसाठी ज्या शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आलीय त्यांच्या मुलांना रेल्वेच्या सेवेत अनुकंपा तत्वावर समाविष्ट करण्याची मागणी आज खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत केली आहे.

रावेर लोकसभा अंतर्गत सेंट्रल रेल्वे मध्ये भुसावळ विभागात भुसावळ-जळगाव चौथ्या रेल्वेलाईन साठी जळगाव व भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांची जमीन रेल्वेद्वारे अधिग्रहित केलेली असून, सदर शेतकर्‍यांच्या परिवारातील मुलांना रेल्वेमध्ये अनुकंपाच्या तत्वावर नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकसभेमध्ये केली.

या संदर्भात लोकसभेमध्ये बोलताना खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जळगाव-भुसावळ चौथ्या रेल्वेलाईनला अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करून गतिमान केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. तसेच रेल्वे विभागामार्फत दि.११/११/२०१९ रोजी काढण्यात आलेल्या अधिनियम नुसार रेल्वेद्वारे अधिग्रहित केलेल्या जमिनी मोबदल्यात यापासून पुढे रेल्वेद्वारे नोकरी देण्यात येणार नाही व देण्यात येणारा मोबदला सुद्धा कमी देण्यात येईल अशी माहिती दिली. त्यामुळे अनुकंपग्रस्त नागरिकांचे नुकसान होणार असून, सदर अधिसूचना काढल्यापासून आधीच रेल्वेद्वारे जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना रेल्वेमध्ये नोकरी देऊन समाविष्ट करणे करण्यात यावे अशी मागणी केली.

याप्रसंगी रक्षाताई खडसे पुढे म्हणाल्या की, जबलपूर मंडळ अंतर्गत रीवा-सिधी-सिंगरोली तथा सतना-पन्ना नवीन रेल्वे लाईनसाठी करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहणातील शेतकर्‍यांच्या परिवारातील सदस्यांना अलिकडेच सन २०२१ मध्ये नोकरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने, भुसावळ-जळगांव चौथ्या रेल्वे लाईनसाठीचे अधिग्रहण हे २०१७ चे असून रेल्वेची अधिसूचना ही नोव्हेंबर २०१९ असल्याने त्याच आधारावर या शेतकर्‍यांच्या परिवारातील सदस्यांना रेल्वे मध्ये नोकरी देण्यात यावी अशी मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत केली. यामुळे जमीन अधिग्रहीत झालेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Protected Content