Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव Rajiv Satav यांचे आज निधन झाले. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.

खासदार राजीव सातव Rajiv Satav यांच्या निधनाची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.

राजीव सातव यांची प्रकृती मध्यंतरी गंभीर बनली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. अर्थात, त्यांनी कोरोनावर मात केली होती. तथापि, यानंतर त्यांना सायटोमॅजिलो हा विषाणूचा संसर्ग झाल्याचे चाचणीतून दिसून आले होते. या विषाणूत रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होत असते. याच संसर्गामुळे त्यांनी आज पहाटे पाच वाजता शेवटचा श्‍वास घेतला.

राजीव सातव यांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेसमधील एका उमद्या नेत्यांचा अकाली अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ते राहूल गांधी यांच्या खास मर्जीतील होते. अलीकडेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुध्दा त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचे एक उभरते कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Exit mobile version