Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएमसी बँक खातेधारकांचे मुंबईतील आरबीआय कार्यालयासमोर आंदोलन

pmc bank

 

मुंबई प्रतिनिधी । पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई व्हावी, यासाठी मागील सात दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात पीएमसी खातेधारकांचं आंदोलन सुरु आहे. मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी आज आरबीआयच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. तरीही शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप आंदोलनकर्ते पीएमसी खातेधारक करत आहेत.

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी. तसेच सर्व खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत, या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आज आरबीआयच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पीएमसी बँक खातेधारक सहभागी झाले असून खातेधारक ‘आरबीआय चोर है’ अशा घोषणा देत आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, पीएमसी बँकेतील घोटाळ्याबाबत आरबीआयला 2011 पासूनच माहिती होती. तरीदेखील त्यांनी कारवाई केली नाही, असा आरोपदेखील आंदोलकांनी यावेळी केला.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँक प्रकरणात गेल्या आठवड्यात तीन माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मुक्ती बाविसी, तृप्ती बने आणि जगदीश मोखे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तीन अटकेनंतर पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12 वर पोहोचली आहे.

Exit mobile version