Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे

नाशिक- वृत्तसेवा । उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुमारे साडेचार हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांच्या भरती प्रक्रियेस शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या हिरव्या कंदिलामुळे या जागा भरल्या जातील. त्यामुळे डी. एड., बीएड. पदविकाधारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यात बोगस पटपडताळणीच्या निर्णयानंतर अनेक वर्षे शिक्षक भरती प्रक्रिया ठप्प होती. गेल्या काही वर्षांत शिक्षणमंत्र्यांनी अनेकदा शिक्षकभरतीचे ‘गाजर’ दाखवून भावी शिक्षकांचा हिरमोड केला. त्यामुळे संतप्त झालेल्या डी.एड., बीएड. पदविकाधारकांनी सोशल मीडियातून भरतीबाबत मोहीम सुरू केली होती.

राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या हजारो उमेदवारांना शिक्षण आयुक्तालयाने आनंदाची बातमी दिली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळावर तत्काळ जाहिराती देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

शिक्षकांच्या तीस हजार जागांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, बिंदूनामावली तपासणी, शिक्षक समायोजन अशी तांत्रिक प्रक्रिया लांबली आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर मात्र अद्याप जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने, उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर होता.

संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्तपदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, विषयनिहाय रिक्तपदांची माहिती संकेतस्थ‌ळावर नोंदणी करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या ‘लॉगिन’वर देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करीत योग्य असल्यास बिंदूनामावली, विषयनिहाय रिक्तपदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ‘लॉगिन’द्वारे मान्य करतील.

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या ‘लॉगिन’वर जाहिरात तयार करणे यावर ‘क्लिक’ केल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्तपदांची जाहिरात तयार होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षणनिहाय रिक्तपदे, गट, विषयनिहाय रिक्तपदांच्या माहितीची पडताळणी करीत जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र संकेतस्थळावरील सूचनांनुसार तत्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी भरती प्रक्रियेचे नियोजन केले असून नव्या शैक्षणिक वर्षात नवीन शाळांमध्ये शिक्षक रुजू होतील. सरकारी व खासगी संस्थानिहाय पवित्र संकेतस्थळावर स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती गुणवत्तेनुसार होणार आहे. टीईटी व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची गुणवत्तायादीनुसार उमेदवारांना संधी मिळणार आहे.

Exit mobile version