Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील ८४ हजाराहून अधिक शेतकरी प्रोत्साहन योजनेत पात्र

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लाभ देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ मार्च रोजी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यात मे अखेर सर्वेक्षण अहवालानुसार जिल्हा बँकेचे ८४ हजाराहून अधिक शेतकरी प्रोत्साहन योजनेत पात्र असल्याची माहिती कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या २५० शाखा असून त्यांच्याशी संलग्न ८७७ विकास सोसायट्यांद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत केले असून सुमारे तीन लाखांहून अधिक सभासद आहेत. यावर्षी सुमारे १२५ हून अधिक विकासो ची १०० टक्के पीककर्ज परतफेड शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच गेल्या २०१७-१८ पासून बहुताश शेतकरी नियमित कर्जफेड करीत असून यावर्षी राज्य शासनाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ मार्च रोजी जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्याचे शासन स्तरावरून ६ मे रोजी सहकार विभाग जिल्हा उपनिबंधकांकडे निर्देश देण्यात आले होते.

१ जुलै कृषीदिनापासून मिळणार लाभ
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्यानुसार प्रोत्साहन अनुदानाचे वाटप १ जुलै कृषीदिनापासून सुरू करण्यात येणार असून, कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेचे सुमारे ८४ हजार शेतकरी नियमित कर्जफेड प्रोत्साहन योजनेत पात्र असल्याचे जिल्हा बँक प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version