Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला हॉस्पीटलमध्ये जंबो कोविड केअर सेंटर ! (Video)

जळगाव  प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोविडग्रस्तांची वाढती संख्या पाहता अनेक रूग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, मोहाडी रोडवर पूर्णत्वाकडे आलेल्या महिलांच्या रूग्णालयात जंबो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. यात तब्बल ८०० रूग्णांवर उपचाराची व्यवस्था होणार असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी हॉस्पीटलची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, मोहाडी रोडवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या महिलांच्या हॉस्पीटलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याची तयारी पूर्णत्वाकडे आली असून ५ एप्रिल रोजी हे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महिला रूग्णालयाची पाहणी केली. यात त्यांनी सध्या सुरू असणार्‍या कार्याचा आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सोनवणे, नगरसेवक अमर जैन आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण सहकार राज्यमंत्री असतांना फक्त महिलांसाठी अद्यायावत असे रूग्णालय उभारण्यासाठी मान्यता मिळवून आणली होती. मोहाडी रोडवरील प्रशस्त जागेत या हॉस्पीटलचे काम सुरू करण्यात आले असून आता ते पूर्णत्वाकडे आले आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदा १०० बेडची व्यवस्था करण्यात येत असून गरज भासल्यास येथे तब्बल ८०० बेडचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामुळे जिल्हा शासकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयावर पडणारा लोड कमी होणार असून प्रत्येक रूग्णाला अद्यायावत उपचार मिळणार आहे. पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून येत्या काही दिवसांमध्ये याच प्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले.

 

Exit mobile version