Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी यांची नवी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना संबोधित केलं. यामध्ये त्यांनी देशातील कोट्यवधी घरांना सौरउर्जेची भेट देण्याची घोषणा केली. अयोध्येतून परतल्यानंतर त्यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजने’बाबत माहिती दिली.

भारत देशाला अधिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी, आणि वीजेची टंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. ही योजना कशी राबवण्यात येईल, त्याचा फायदा कुणाला होईल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. वन इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमध्ये देशभरातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे. यामुळे या घरांमध्ये वीजेची टंचाई राहणार नाही. मध्यमवर्गीयांना वीजेचं बिल कमी करण्यासाठी याचा फायदा होईल. तर ज्या गरीबांच्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, त्यांची घरं या योजनेमुळे उजळून निघणार आहेत.
यामध्ये घराच्या छतावर सोलर पॅनल्स लावण्यात येतात. यामध्ये असणाऱ्या प्लेट्स सूर्यप्रकाशातील उर्जा शोषून घेतात आणि त्यांचं वीजेमध्ये रुपांतर करतात. पॉवर ग्रिडमधून येणारी वीज आणि सोलर पॅनलमधून तयार झालेली वीज यामध्ये फारसा फरक नसतो. त्यामुळे घरामध्ये आपण वेगळी वीज वापरत आहोत याची जाणीवही होत नाही.
ही योजना नेमकी कधीपासून सुरू होणार आहे याबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच यासाठीचा रोडमॅप जारी करण्यात येईल. सध्या सोलर पॅनलबाबत केंद्र सरकारची आणखी एक योजना सुरू आहे, ज्यामध्ये सरकार यासाठी सब्सिडी देत आहे.

तुम्ही किती क्षमतेचे पॅनल्स आणि बॅटरी लावत आहात यावर सोलर पॅनल सेटअपचा खर्च अवलंबून असतो. एक किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 50 हजार ते एक लाख रुपये एवढा खर्च येतो. तर 5 किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 2.25 ते 3.25 लाख रुपये खर्च येतो. सध्या केंद्र सरकार ‘नॅशनल रुफटॉप स्कीम’ अंतर्गत सोलर पॅनलवर 40 टक्के सब्सिडी देत आहे.

Exit mobile version