मोदींचे भक्त अनेक, पण ते स्वत:चेच भक्त ! : शिवसेनेची टीका

मुंबई प्रतिनिधी | मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांच्या विधानावर भाष्य करत आज शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांचे अनेक भक्त असले तरी ते मात्र स्वत:चेच भक्त असल्याचा टोला मारत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील संपादकीयमध्ये आज पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, मेघालयचे राज्यपाल मलिक यांनी आता असे म्हटले आहे की, मोदी हे प्रचंड अहंकारी गृहस्थ आहेत. मलिक पुढे सांगतात ते महत्त्वाचे. शेतकरी आंदोलन संपवा, आतापर्यंत ५०० शेतकरी मरण पावले आहेत, असे सांगण्यासाठी आपण मोदींना भेटलो तेव्हा त्यांचा प्रतिसाद बरा नव्हता. माझ्यासाठी ते ५०० शेतकरी मेलेत काय? असा उलटा प्रश्न मोदी यांनी केला तेव्हा आपले व त्यांचे भांडण झाल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला. खरेखोटे मोदीच जाणोत. मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, कार्यपद्धती कशी आहे ते काही लपून राहिलेले नाही. मोदींचे भक्त अनेक आहेत, पण मोदी स्वतःचेच भक्त आहेत. स्वभक्ती आली की अहंकार हा आलाच, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, मेघालयचे राज्यपाल हे मूळचे भाजपाचे किंवा संघ परिवाराचे नाहीत. ते जाट नेते, समाजवादी विचारांचे आहेत. त्यामुळे शिस्त वगैरे गोष्टींशी त्यांचा संबंध नसावा. अशा समाजवादी विचारांच्या नेत्यास मोदी यांनी राज्यपाल केले याचा काय अर्थ घ्यायचा? आता राज्यपाल पदाची मुदत संपताना राज्यपालांच्या मनगटातील जाट पण उसळून आले आहे, असं म्हटलंय. शेतकरी सरकारविरोधात जात आहे व उत्तर प्रदेश, पंजाबच्या पोटनिवडणुकीत भाजपास याचा फटका बसेल याची खात्री पटल्यावरच मोदी यांनी शेतकर्‍यांवर दया केली व तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. लोकरेट्यांपुढे भल्याभल्यांचा अहंकार गळून पडतो हेच या निमित्ताने दिसले. प. बंगाल निवडणुकीत भाजपाचा अहंकार टोकाला पोहोचला होता. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही अहंकाराचा उथळ खळखळाट वाढलाच होता. शेवटी तो अहंकार राजभवनामागच्या समुद्रात गटांगळ्या खाताना लोकांनी पाहिला. आजही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावू अशा धमक्या देणे हा अहंकार नाही तर काय?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

मलिक हे गोव्याचे राज्यपाल होते. तेथील सरकारच्या भ्रष्टाचाराची त्यांनी पोलखोल केली. गोवा सरकार जागोजाग भ्रष्टाचार करीत असल्याचे फटाके त्यांनी फोडले, तेव्हा त्यांची पाठवणी मेघालयात करण्यात आली. जम्मू-कश्मिरात राज्यपाल असताना एक महत्त्वाची फाईल मंजूर करण्यासाठी संघ परिवारातील प्रमुख नेत्याने ३०० कोटींची लाच देण्याचा कसा प्रयत्न चालविला होता याचाही स्फोट मलिक यांनी केला. त्याच फटाक्यांची माळ घेऊन मलिक वावरत असतात. त्यांच्या नावात ङ्गसत्यफ आहे. मोदींच्या अहंकारावर त्यांनी आता हल्ला केला आहे. तसे ते बेडर दिसतात, परिणामांची पर्वा करताना दिसत नाहीत. सत्यपाल मलिक हे जाट आहेत व जाट बंडखोर असतो ते या निमित्ताने दिसले, असे यात शेवटी नमूद करण्यात आले आहे.

Protected Content