Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारला राहूल गांधींचे भय ! : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले असल्याची स्तुतीसुमने शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातून उधळण्यात आली आहेत.

राहूल गांधी हे काँग्रेसची धुरा पुन्हा सांभाळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी होकार दिला आहे ही बातमी पक्की होताच दुसर्‍या बाजूला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले, म्हणजे वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाने ङ्गरेडफ टाकली. हा योगायोग नक्कीच नाही. रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत हे सोडा, वढेरा यांच्याबाबत अनेक विवाद आणि प्रमादही आहेत, पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही. कोविड-१९ वर वैज्ञानिकांनी लस शोधून काढली तरी एखादी लस राजकीय पोटदुखी, राजकीय सूडबुद्धीच्या आजारावरदेखील काढता आली असती तर किती बरे झाले असते! गांधी परिवारातील सदस्यांकडून जर खरोखरीच फौजदारी गुन्हे घडले असतील तर त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही, पण जेव्हा अशा तर्‍हेच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा पद्धतशीर प्रचार होतो आणि ङ्गङ्घफास आवळला जात आहेफफ असली भाषा मुद्दाम पसरविली जाते तेव्हा या हालचालीमधले राजकारण स्पष्ट होते.

यात पुढे नमूद केले आहे की, हे फक्त रॉबर्ट वढेरा यांच्याबाबतीत घडतेय असे नाही. भाजपच्या विरोधात उभे राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर असा हल्ला सुरू आहे. राजकीय विरोधकांच्या पैशांचे व्यवहार खणून काढले जात आहेत. या उत्खननात हाती लिंबू लागला तरी भोपळा हाती आल्याची बोंब मारली जाते. त्यामुळे लोकांना या बोंबलण्यात रस राहिलेला नाही. परदेशातून काळे धन आणायची गर्जना तर पंतप्रधान मोदी यांनीच केली आहे. या काळया धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे? विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे.

यात शेवटी नमूद केले आहे की, राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत असा प्रचार करूनही श्री. गांधी अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधार्‍यांना वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे असे या अग्रलेखात म्हटले आहे.

Exit mobile version