Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16/03 / 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.

अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी.
दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील.

Exit mobile version