आमदारांना नाही मिळणार मोफत ‘घर’- उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । राज्यातील आमदारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाबाबत महत्त्वाचा खुलासा केला असून आमदारांना मोफत घरे मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

याविषयी पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की, आमदारांना घर देऊ, पण मीडियाने असं म्हटलं की, आमदारांना फुकट घरं देणार. पण मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही .ज्यांना मुंबईत घर नाही अशांना घर असं ते होतं. मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही.

“आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,” असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी करोना असतानाही चार कोटी केला, आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे, सहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घरं दिली जाणार आहेत. कशासाठी घरं पाहिजेत?”.

 

Protected Content