शिवसेनेची अवस्था गटारातल्या बेडकासारखी ! : आ. गिरीश महाजन

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना पक्ष सत्तालंपट असून त्यांची अवस्था गटारातील बेडकासारखी झाली असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली. येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.

येथील महापौर प्रदीप कर्पे यांच्या मुलाच्या विवाहाला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी शिवसेनेच्या सभेबाबत विचारणा करण्यात आली. यावर आमदार महाजन म्हणाले की, राज्यात विकासकामांचा अक्षरश: ठणठणाट असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त आणि फक्त भाजपवर टीका केली आहे. राज्यातील रस्ते विकास, मेट्रो, समृद्धी महामार्गात शिवसेना, महाविकास आघाडी सरकारचे काय कर्तृत्व आहे. हे विकास प्रकल्प मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत झाले आहेत. त्यांच्या जीवावर तुम्ही (विरोधक) कॉलर टाईट करत आहात. देशात केवळ भाजपशी युती असल्याने शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने चार खासदार तरी निवडून आणावे, असे आव्हान आमदार महाजन यांनी दिले. तर भविष्यात शिवसेनेचे २५ पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत असेही भाकीत केले.

आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या दाखल्याची भाजपसह पंतप्रधान मोदी यांना गरज नाही. देशात सर्वाधिक बहुमताने मोदींच्या नेतृत्वात भाजपची ऐतिहासिक सत्ता आली आहे. शिवसेनेची कुवत काय हे आधी ओळखावे. या पक्षाची अवस्था गटारातील बेडकासारखी झाली आहे. यापेक्षा समुद्रात काय चाललंय ते त्यांनी पाहावे. देशाची जनता मोदींकडे नेतृत्व म्हणून पाहते. त्यावर शिवसेना काय डराव…डराव करते, अशी टिका आमदार महाजन यांनी केली.

Protected Content