Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार अनिल पाटील यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा, मठगव्हाण, रुंधाटी, नालखेडा, गंगापुरी, खापरखेडा या शिवारात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेत तुडुंब भरले आहेत. शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आलेली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सदर शिवाराची आमदार अनिल पाटील यांनी पाहणी केली.

दरम्यान, तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून ओल्या दुःष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून प्रजन्यमान कमी असले तरी या भागातील शेतजमीन पावसामुळे पूर्ण पाण्याने भरून जाते गेल्या वर्षी आमदारांनी या भागातील शेतजमिनींचा सर्व्हे करण्यासाठी आग्रह धरलेला होता त्यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व यंत्रणा देखील सोबत होती.या भागातील सर्व्हे करून पातोंडा व सावखेड्याच्या नाल्यांमध्ये हे पाणी कसे वळवता येईल तसेच त्या ठिकाणी असलेल्या दोन पाटचाऱ्यांचे सिंचन विभागाच्या माध्यमातून खोलीकरण करता येईल व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींच्या माध्यमातून शेतातील पाणी बाहेर कशा प्रकारे काढता येईल याबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रजन्यमानाच्या व शासनाच्या नियमानुसार ६५ मिलीपेक्षा पाऊस जास्त असला तर शेतीतील पिकांचे पंचनामे करता येतात मात्र या भागात  प्रजन्यमान कमी असले तरी पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते व पिकांचे नुकसान होते यामुळे या भागाच्या भौगोलिक परिस्थिती चा अभ्यास करून या शेतजमिनींचा पंचनामा करण्यात यावा, तसा प्रस्ताव  व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल.

भविष्यात या भागातील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा कसा होईल व लोकांना न्याय कसा मिळेल याचा विचार करून संबंधित विभागातील यंत्रणेशी संपर्क झालेला आहे.लवकरात लवकर या भागाचे सर्वेक्षण होऊन व संबंधित विभागांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल असे आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version