Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मु.जे. महाविद्यालयातील योग शिक्षक प्रा. देवानंद सोनार यांना पीएच.डी. जाहीर

pankaj Sonar news

जळगाव प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयातील सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी विभागात कार्यरत असलेले सहा.प्रा. देवानंद सोनार यांना “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या योग विचारांचे चिकित्सक अध्ययन” या विषयासाठी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथून पीएचडी प्राप्त केली.

प्रा. सोनार यांचा परिचय
प्रा. देवानंद सोनार हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असून जळगाव खान्देश येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. देवानंद सोनार यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण योगशास्त्र विषयात पूर्ण केले असून आता त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथून योगशास्त्र विषयातील पीएच. डी. प्राप्त केली आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय तत्वज्ञान तथा संस्कृती या विद्याशाखे अंतर्गत भारतीय दर्शन शास्त्र विभागातून आपले संशोधन कार्य पूर्ण केले.

“राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या योग विचारांचे चिकित्सक अध्ययन” हा त्यांच्या संशोधनाचा विषय असून या संशोधनासाठी त्यांना डॉ. ए. एन. खोडस्कर (सेवानिवृत्त प्राचार्य, डिग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, अमरावती) यांचे मार्गदर्शन लाभले. पदवी-पदव्युत्तर शिक्षणापासून पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारे खान्देश विभागातील ते पहिले पीएच.डी.धारक आहेत. प्रा. देवानंद सोनार यांनी योगशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालयातून विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले आहे. योग विषयातील नेट सुद्धा त्यांनी प्रथम प्रयत्नात क्वालिफाय केली आहे. त्यामुळे योग क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

मान्यवरांकडून शुभेच्छा
योग क्षेत्रातील सर्व लोकांकडून त्यांचे या यशासाठी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल केसीई अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, प्र.कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, योग विभागप्रमुख प्रा. आरती गोरे, आजीवन प्रचारक हरिभाऊ वेरुळकर गुरुजी तसेच सर्व मित्र परिवार आणि सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version