Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठी सहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मंत्री पाटील यांनी केली तरूणाईंशी चर्चा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व  पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी चक्क महाविद्यालयात जावून युवक – युवतींशी संवाद साधला. तरुणाईला साहित्य संमेलनात माहिती व ज्ञानाचा खजिना मिळेल. जो भविष्यात तूमच्या कामी येईल, अशा शब्दात त्यांनी तरुणाईला साद घातली.

संमेलनाच्या तयारी संदर्भात मंत्री‌ अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपूर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली. त्यानंतर तयारी कुठपर्यंत आली, आता कोणती कामे शिल्लक आहेत. याची माहिती जाणून घेतली. तसेच मदतीसाठी सेवेकरी, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक नेमणूक याबाबत सविस्तर चर्चा केली आणि काही महत्त्वपूर्ण सूचना देखील केल्या.

मराठी साहित्य संमेलनासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत संमेलनाच्या तयारीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका, जबाबदारीचे विकेंद्रीकरण करा आदी सूचना श्री.पाटील यांनी दिल्या. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी व म.वा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत संपूर्ण स्थळाची पाहणी केली. यावेळी काही बदल देखील त्यांनी सुचविले. दरम्यान या पाहणी दरम्यान मंत्री पाटील यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवतींशी संवाद साधत त्यांच्यात संमेलनाबाबत उत्सुकता देखील वाढवली.

सदर बैठकीत प्रांतधिकारी तथा संमेलनाचे समन्वयक महादेव खेडकर, डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, तहसीलदार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, खा.शि. मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील व इतर शाखा अभियंता, मंडळाचे शरद सोनवणे, संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, श्यामकांत भदाणे, बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, प्रा शिला पाटील, स्नेहा एकतारे, प्राचार्य डॉ ए. बी. जैन यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version