Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खरेदी-विक्रीचे सर्व्हर डाऊनमुळे लाखोंचा बुडाला महसूल

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी असलेल्या ‘सरीता’ आणि ‘एलआर’ या प्रणालीचे  दिवसभरापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे २२ फेब्रुवारी रोजी लाखोंचा महसूल बुडाला आहे. दरम्यान, दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना मुद्रांक कार्यालयात दिवसभर ताठकळत रहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान सर्व्हर डाऊन असल्याचा दुजोरा मुद्रांक विभागाचे जिल्हा उपनिबंधक सुनील पाटील यांनी दिला.

घरे, जमीनीच्या खरेदी-विक्रीची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद केली जाते. जळगाव शहरासह तालुक्यांमध्ये दस्त नोंदणी केली जाते. ही दस्त नोंदणी ऑनलाईन केली जाते. परंतू मुद्रांक विभागाचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अडथळे निर्माण झाले आहे. सकाळी ११ वाजता दस्त नोंदणीचे सर्व्हर कमी वेगाने होते. त्यानंतर पुर्णपणे बंद झाले. परिणामी खरेदी-विक्री दस्त नोंदणीसाठी आलेले नागरिक ताटकळत होते. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. दस्त नोंदणीसाठी आणि ७/१२ उतार्‍यासाठी ‘सरीता’ आणि ‘एलआर’ ही संगणकीय प्रणाली एकमेकांशी निगडीत आहे. ७/१२ लिंक करुनच कागदपत्रांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. मात्र सकाळपासूनच या दोन्ही सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने प्रणाली बंद होती. 

त्यामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर, राज्यातील अनेक दस्त नोंदणी मुद्रांक कार्यालयांत आलेल्या नागरिकांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  जळगाव जिल्ह्यात दैनंदिन जवळपास ५०० च्या वर दस्त नोंदणी होत असल्याची माहिती मुद्रांक विभागाचे जिल्हा उपनिबंधक सुनील पाटील यांनी बोलतांना दिली आहे. सकाळपासून सर्व्हर डाऊन असल्याने जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहाराच्या दस्त नोंदणी रखडल्या. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूलदेखील  बुडाला आहे

 

Exit mobile version