Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘मी परिस्थितीनुसारच खेळत असतो’- ऋषभ पंत

pant 1

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय कधी सापडणार नाही का? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतही चौथ्या क्रमांकाचा योग्य पर्याय नसल्याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला. गेल्या 3 वर्षांमध्ये या क्रमांकासाठी अनेक पर्याय आजमावण्यात आले, मात्र हाती काहीच लागलं नाही.

वर्ल्ड कप स्पर्धेत लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियानं पर्याय शोधला होता, परंतु शिखर धवनच्या दुखापतीमुळे त्याला सलामीला यावं लागले. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी रिषभ पंतने या क्रमांकावर दावा सांगितला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. तो म्हणाला,” मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. हा क्रमांक माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही आयपीएलमध्ये मी याच क्रमांकावर खेळलो आहे. त्यामुळे हे काम माझ्या नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मला वेगळा सराव किंवा फलंदाजीत बदल करण्याची गरज नाही. परिस्थितीनुसारच मी खेळत आलो आहे.” तसेच 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठीच्या तीनही फॉरमॅटमधील संघात पंतचा समावेश करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात त्याची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पंत म्हणाला, ”धोनीची उणीव भरून काढणे प्रचंड आव्हानात्मक आहे, पण मी याच गोष्टीचा विचार करत राहिलो तर कामगिरीवर परिणाम होईल. त्यामुळे लोकं काय म्हणत आहेत, याचा विचार मी नाही करत. मला काय करायचे आहे, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.”

Exit mobile version