Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विचार, भावना आणि कृतीच्या समन्वयासाठी मानसिक आरोग्य गरजेचे – डॉ. प्रतिभा हरनखेडकर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   के. सी. ई. सोसायटीच्या मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च जळगावच्या ‘बदलत्या युगातील मानसिक आरोग्य’ ह्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कॉऊन्सेलर डॉ. प्रतिभा हरनखेडकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कॉऊन्सेलर डॉ. प्रतिभा हरनखेडकर  म्हणाल्या की, व्यक्ती जसा विचार करते तश्याच तिच्या भावना तयार होतात आणि ह्या भावनांना व्यवस्थित हाताळता आले नाही तर व्यक्तीचे वागणे टोकाचे आक्रमक किंवा टोकाचे एकलकोंडे होते. ह्या टोकाच्या अवस्थांचे योग्य ते संतुलन करणे गरजेचे आहे. प्रचंड धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या ताणामुळे मनाची अवस्था खालावलेली आहे. म्हणूनच शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मन शांत राहिल्यास सर्व कामे सुरळीत होतात. त्यासाठी मनाला शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. तरुण पिढीला भरकटवण्यासाठी असंख्य माध्यमं उपलब्ध असल्यामुळे तरुणांनी आपल्या मनाला खासकरून शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. निसर्गाने फक्त मानवाला बुद्धी दिलेली आहे ती चांगला विचार करण्यासाठी, विचार चुकलेली व्यक्ती चुकीच्या मार्गाने पुढे जायला लागते आणि त्यातूनच लव्ह जिहाद, लिव्ह इन रेलशनशिप ह्या सारख्या चुकीच्या मार्गाने तरुणाई भरकटत राहते असे सांगितले .

के. सी. ई. सोसायटीच्या मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च जळगावच्या ‘बदलत्या युगातील मानसिक आरोग्य’ ह्या कार्यक्रमाद्वारे  विद्यार्थ्यांशी बोलताना केले. विचार, भावना आणि कृती ह्या एकमेकांशी बांधील आहेत आणि म्हणूनच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ह्या तिघांचा योग्य संगम साधणे गरजेचे आहे. सतर्क राहून भावना ताब्यात ठेवता आल्या पाहिजेत. आपण काय करीत आहोत? त्याचा परिणाम काय होणार आहे? ह्याचा सतत विचार केला पाहिजे. चांगले विचार ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे, रोजच्या दिवसाचे योग्य ते व्यवस्थापन करणे आणि विश्वातील अदम्य अश्या शक्तीवर श्रद्धा ठेवणे हे भावनिक व्यवस्थापनासाठी आणि एकूणच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्वाचे आहे, असा महत्वाचा सल्ला डॉ. हरनखेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या जाणिवा करून दिल्या. शरीराला स्नान, बुद्धीला ज्ञान आणि मनाला ध्यान गरजेचे असते आणि ह्यातूनच मानसिक स्वास्थ टिकून ठेवायला मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असावा आणि सोबतच त्यांचे पाय जमिनीवर असावेत. आपल्या प्रत्येक गोष्टीचा आई वडील समाज ह्यावर काय परिणाम होईल आणि आपले भवितव्य काय असेल ह्याचा  गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. डॉ. हरनखेडकर ह्यांच्या बोलण्याचे समर्थन करीत त्या म्हणाल्या कि  काही वेळा मुले अविचाराने वागतात, कुठलाही विचार न करता पळून जातात. अश्या तीन पालकांची परिस्थिती त्यांनी विद्यार्थ्यांना कथन केली. अविचारामुळे काही काळ मुलामुलींना हे सर्व बरे वाटते पण पुढे काय? आपण केलेले प्रेम खरेच प्रेम आहे का? शिक्षण मध्येच सोडावे लागले तर करियर कसे होणार आहे? आयुष्याबद्दल पुढचे प्लॅनिंग काय? ह्याचे सर्वात भयंकर परिणाम मुलींवर होतात.  हा सर्व प्रकार चालतो तो अविचार आणि मानसिक अनारोग्यामुळे म्हणूनच कुठलाही विचार करण्याअगोदर मानसिक आरोग्यावर काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमासाठी  संस्थेतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते व अश्या प्रकारच्या वेगळ्या विषयाला हात घालणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. दीपाली पाटील यांनी केले.

Exit mobile version