Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूण लवकरच बनणार “शंभर टक्के लसीकरण”चा प्रभाग

जळगाव प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी वार्डाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आठ दिवसांचा सर्व्हे केला होता. त्यात लस न घेतलेल्या नागरिकांची यादी करण्यात आली होती. त्यांना बुधवार दि.१७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लसीकरण करण्यात आले.

 

मेहरूण प्रभागाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मागील आठ दिवसांपूर्वी वार्डातील नागरिकांचा सर्व्हे केला होता. त्यानुसार १७० नागरिक हे लसीकरणापासून वंचित असलेले दिसून आले. त्यामध्ये काहींनी पहिला डोस घेतला नव्हता तर काहींना दुसऱ्या डोसची आवश्यकता होती. या सर्व नागरिकांची नोंदणी करून त्यांच्यासाठी लसीकरण शिबिर भरण्याचे नियोजन प्रशांत नाईक यांनी केले.

बुधवार दि.१७ नोव्हेंबर रोजी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथीचे निमित्ताने प्रभागातील श्री साईबाबा मंदिर येथे नागरिकांसाठी लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिर महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. सुरुवातीला महापौर जयश्री महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी शिवसेना महिला महानगराध्यक्ष शोभाताई चौधरी, सरिता माळी-कोल्हे, स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक उपस्थित होते. नागरिकांनी कोरोना महामारीला दूर सारण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन स्वतःला सुरक्षित करून घ्यावे असे आवाहन यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी केले.

महानगरपालिकेच्या डॉ.पल्लवी पाटील व त्यांच्या कर्मचार्‍यांनी नागरिकांना लस देऊन त्याबाबतची सविस्तर माहिती दिली. प्रभागातच कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरसेवक प्रशांत नाईक यांचे आभार मानले. शिबिरासाठी राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे, योगेश नाईक, महेश घुगे, तेजस घुगे, महेंद्र खुरपडे, रईस शेख, सतीश करोसिया आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version