Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूण तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी मदत करणार : वरूण सरदेसाई (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | मेहरूण तलाव हे जळगाव शहराचे वैभव असून पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून याच्या सुशोभीकरणासाठी सर्वातोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले. मेहरूण तलाव परिसराची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, वरूण सरदेसाई हे आज एक दिवसाच्या जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत महापौरांनी मेहरूणमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यात त्यांची वही तुला करण्यात आली. यातून जमा करण्यात आलेल्या वह्या कोकण आणि पश्‍चीम महाराष्ट्रातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहेत. याप्रसंगी सरदेसाई यांनी मेहरूण तलाव परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची माहिती जाणून घेतली. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी त्यांना याची माहिती दिली. यानंतर आर्कीटेक्ट शिरीष बर्वे यांनी या परिसराला चांगल्या पध्दतीत विकसित करणे शक्य असल्याचे प्रतिपादन करत याबाबतची इत्यंभूत माहिती दिली.

दरम्यान, ही माहिती जाणून घेतल्यानंतर वरूण सरदेसाई यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मेहरूण तलाव हे जळगावचे वैभव असून याचा विकास होणे गरजचे आहे. पर्यटन मंत्रालय हे आदित्यजींकडेच असल्याने या माध्यमातून तलाव परिसराचा विकास करता येणार आहे. यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन वरूण सरदेसाई यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, विराज कावडिया, महिला महानगराध्यक्षा शोभाताई चौधरी, नगरसेवक गणेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version