Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीची ऑनलाईन बैठक

चाळीसगाव प्रतिनिधी । कृषी विज्ञान केंद्राची सातवी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली .

सदरच्या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लखन सिंग संचालक अटारी पुणे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्र जळगाव व इतर संलग्न विभागात सोबत सांगड घालून मुख्य पिके कापूस व केळीवर काम करण्यासाठी भर द्यावा, असे सुचवले. डॉ. लाखनसिंग संचालक अटारी पुणे यांनी कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांची माहिती संकलित करून राज्य व देश पातळीवर पुरस्कार मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील रहावे असे सांगितले. तर डॉ. शरद गडाख संचालक संशोधन व विस्‍तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आकाशवाणी व दूरदर्शनचा अधिकाधिक उपयोग करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे असे सांगितले.

 

 

कुलगुरू यांनी जळगाव जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी अनिल सपकाळे, करंज कृषिभूषण सेंद्रिय शेती महाराष्ट्र शासन 2018 हा पुरस्कार जाहीर झाला त्यांचे विद्यापीठ परिवाराकडून अभिनंदन व्यक्त केले. यासोबतच समाधान पाटील उंबरे धनुका इनोवेटीव पुरस्कार 2020 प्राप्त शेतकरी यांचादेखील अभिनंदन केले. आजच्या बैठकीमध्ये कृषी विज्ञान केंद्र निर्मित लघु चित्रफीतीचे अनावरण करण्यात आले. यामध्ये घरच्याघरी सोयाबीन उगवण क्षमता चाचणी या विषयी बनवण्यात आली. सोबतच भारताचा अमृत महोत्सव कार्यक्रम व जागतिक दुग्ध दिनानिमित्त डिजिटल पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

 

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी नरेंद्र पाटील लोणी, पुनम चौधरी जळगाव, प्रीती झारखंडे वराडसिम, बळीराम बारी शिरसोली, विनोद पाटील अंतुर्ली यांनी कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या कार्याचे अभिप्राय देऊन त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून संलग्न विभागातील अधिकारी अनिल भोकरे उपसंचालक कृषी, डॉ. शेख जिल्हा वन अधिकारी सामाजिक वनीकरण, डॉ. शामकांत पाटील उपायुक्त पशुसंवर्धन विभाग जळगाव, श्रीकांत झांबरे जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड ठाकरे जिल्हा व्यवस्थापक महाबीज, रामचंद्र पाटील जिल्हा उपजीविका अधिकारी उमेद अभियान यांनी संबंधित विभागाच्या योजनांचा समावेश कृषी विज्ञान केंद्राच्या नियोजन आराखड्यामध्ये करण्याविषयी सूचित केले. डॉ. हेमंत बाहेती कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांनी मागील वर्षाच्या कार्याचा आढावा आणि 2021 चे नियोजनाचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विशाल वैरागर व इंजिनीयर वैभव सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version