Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मायावतींनी बसपात केले फेरबदल : भावाला केले उपाध्यक्ष

download 7

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. मायावती यांनी आपला भाऊ आनंद कुमार याच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंद याला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे. बसपात आता राष्ट्रीय स्तरावर दोन समन्वयक बनवण्यात आले आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्य़ा गौतम यांच्याकडेही राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मायावती यांनी आज देशभरातील पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे, यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपली बॅग, मोबाइल फोन, पेन, कारच्या चाव्या बैठकीच्या खोलीबाहेर ठेवाव्या लागल्या. लोकसभा निवडणुकीत बसपाला १० जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या १२ जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकात बसपा स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा मायावती यांनी नुकतीच केली होती. या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची यावरही बैठकीत चर्चा झाली असून अंतिम यादी लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version