Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : मेहरूणमधील क्रीडा संकुलास २४० कोटींची प्रशासकीय मान्यता !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गिरिश महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच जामनेर येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी ३९ कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. सध्या नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांकरिता नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल कार्यरत आहे. जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यांसाठी जळगाव मधील मेहरूण येथील गट नंबर ३४३ मध्ये १४.६५ हेक्टर (३६ एकर) जागेत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास जागा मंजूर आहे.

जळगाव विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटी ५४ लाखांची प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे.् जळगाव व धुळे जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना या क्रीडा संकुलाचा मोठा फायदा होणार आहे. जळगाव तसेच खान्देशातील आसपासच्या जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ३६ एकर जागेवर उभारण्यात येणार्‍या विभागीय क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदाने, धावपटू साठी ट्रक, बास्केटबॉल, हॉलीबॉल साठी मैदान, टेनिस कोर्ट, आदींसह खेळाडूंना लागणा-या अद्ययावत सोई सुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

जामनेर येथे तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठीही ३९ कोटी ५३ लाख ४९ हजार रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे जामनेर मधील खेळाडूंना खेळासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. असेही महाजन यांनी सांगितले.

Exit mobile version