Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चक्क रूमालावर छापली लग्नपत्रिका : श्रीखंडे परिवाराची हटके स्टाईल !

पहूर, ता. जामनेर रविंद्र लाठे । विवाह सोहळा म्हटले की, लग्नपत्रिका आलीच. सध्या विविध शैलीत पत्रीका छापण्याकडे कल वळला आहे. या पार्श्‍वभूमिवर, वरणगाव येथील श्रीखंडे परिवाराने चक्क हात रूमालावरच लग्नपत्रिका तयार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या सर्वत्र लग्न सराईची धामधूम सुरू असून नातेवाईक व मित्रमंडळी यांना लग्नाचे आमंत्रण देणे म्हणजे लग्नपत्रिका आल्याच. काळ बदलला, त्याप्रमाणे वेळही बदलली. याप्रमाणे विवाह असलेल्या कुटुंबियांकडून आकर्षक लग्नपत्रिका छापण्यासाठी कल असतो. लग्न सोहळ्याचे आयोजन म्हणून बाजारपेठेत विविध प्रकारचे आकर्षक लग्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. आपल्याला परवडेल किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नपत्रिका खरेदी करून ते प्रिंट करुन नातेवाईक व मित्र मंडळी यांना वाटप करण्यात येतात. परंतु येथील श्रीखंडे परिवाराने एक आगळावेगळा उपक्रम राबवून नाविन्यपूर्ण प्रकारची लग्नपत्रिका तयार केली आहे. यात अशोक आप्पा श्रीखंडे यांचा पुतण्या व गणेश आप्पा श्रीखंडे यांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी कागदी पत्रिकांचा वापर न करता चक्क पांढर्‍या हातरूमालावर प्रिंट करून लग्नपत्रिका तयार करण्यात आली आहे.

ही आगळीवेगळी संकल्पना नवरदेव गौरव श्रीखंडे यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली आहे. बहुतांश पत्रीका या कागदावा छापण्यात येतात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच कागदी लग्न पत्रिका लग्न समारंभ आटोपल्यानंतर रस्त्यावर पायदळी पडलेल्या आढळून येतात. या बाबींचा विचार करता, पर्यावरण संतुलनासह पत्रिकांची विटंबना होऊ नये म्हणून चक्क हातरूमालावर पत्रिका छापण्याचा निर्णय घेतला असल्याचे गौरव श्रीखंडे यांनी सांगितले. या आगळ्यावेगळ्या पत्रिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Exit mobile version