Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कापूस खरेदीसाठी पणन महासंघाचा लवकरच सीसीआयशी करार-देशमुख

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीसाठी पणन महासंघाचा लवकरच सीसीआय सोबत करार होणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अनंदराव देशमुख यांनी दिली. चांदसर येथे झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्य कापूस पणन महासंघाची बैठक चांदसर येथील पवार फार्म हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. ही बैठक खान्देशात आयोजित करण्यात आली होती. महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णू साळुंखे, उषा शिंदे, संजय पवार, प्रसनजीत पाटील, पंडितराव चोखट, राजकिशोर मोदी, शिरीष धोत्रे, सुरेश चिंचोळकर, सुरेश देशमुख, सुधीर कोठारी, शिवाजीराव दसपुते, नरेंद्र ठाकरे, भरत चामले, नामदेवराव केशवे, व्यवस्थापक महाजन जे. पी. महाजन उपस्थित होते.

कापूस पणन महासंघामध्ये तब्बल १९८९ पासून कर्मचारी भरती झालेली नाही. त्यामुळे १०० ग्रेडर आणि ५० लिपिकांची पदे भरण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसा प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार आहे. सन २०१९-२० या हंगामातील कापूस खरेदीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. महासंघ सीसीआयची एजंट एजन्सी म्हणून राज्यात कापूस खरेदी करीत असते. परंतु यासाठी केलेला करार हा सीसीआयकडून एकतर्फी असतो. यातील काही बाबी महासंघाच्या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. सीसीआय महासंघाला केवळ १५ लाख क्विंटल कापूस खरेदीचेच प्रशासकीय खर्चा एवढेच कमिशन देत असते. उर्वरित कापूस महासंघ विनामूल्य खरेदी असल्याने यात यावर्षी बदल करावा, अशी महासंघाची मागणी आहे. पुढील आठवड्यात सीसीआयच्या बैठकीत हा विषय मांडला जाणार आहे.

यानंतर पत्रकारांशी बोलतांना महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख म्हणाले की, नव्या हंगामातील कापूस खरेदीबाबत लवकरच सीसीआयसोबत वार्षिक करार करण्यात येणार आहे. हा करार एकतर्फी नसावा, त्यात पणन महासंघ आणि शेतकरी हिताच्या काही बाबींचा समावेश करावा तसेच लवकर खरेदी सुरू करावी. यासंदर्भात पुढील आठवड्यात सीसीआयसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, महासंघात मनुष्यबाळाची तीव्र टंचाई असून कर्मचारी भरतीबाबत राज्य शासनाला प्रस्ताव देण्याबाबत संचालक मंडळाने ठराव केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Exit mobile version