Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ललित कला केंद्रातील कलावंतांवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलवर मोर्चा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटकांकडून कलावंत विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने अमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

याबबात अधिक माहिती अशी की, पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या वतीने नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटक तेथे येऊन घोषणाबाजी करत कलाकारांना मारझोड केली तसेच महिला कलाकारांचा विनयभंग केल्याचा प्रयत्न समोर आला होता. दरम्यान या प्रकरणात सरकारने पोलीस प्रशासनावर दबाव टाकून कलाकार, दिग्दर्शक व विभाग प्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये अमळनेर शहराचे कलाकार भावेश राजेंद्र व भूमिका घोरपडे यांचा देखील समावेश आहे.

या घटनेच्या आणि या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा अमळनेरातील शहरातील जुने रेस्ट हाऊसजवळील महाराणा चौक येथून काढून अमळनेर तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Exit mobile version