Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा समाज आक्रमक : ‘रास्ता रोको’ करत शासनाचा निषेध

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडका येथे मराठा समाजबांधवांनी आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध देखील करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेल्या असताना त्यांना पाठिंबा म्हणून खडका येथील ज्ञानेश्वर आमले हे देखील गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे. शासन स्तरावरून त्यांच्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली जात नसताना आज खडका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते.

या अनुषंगाने आज भुसावळ तालुक्यातील खडका येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये महिला भगिनी पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करीत मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे असा आग्रह धरीत या ठिकाणी जिल्ह्यातील तीनही मंत्री ना. गुलाबराव पाटील ना. गिरीश महाजन ना. अनिल पाटील यांचा या ठिकाणी जाहीर रित्या निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राखण्यात आला होता.

या आंदोलनात आबालवृध्दांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर पाठींबा दर्शविला. तसेच समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार्‍या सत्ताधार्‍यांचा देखील याप्रसंगी निषेध करण्यात आला.

Exit mobile version