Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनवेल आश्रमशाळेतील शिक्षक राकेश महाजन राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक राकेश चिंधू महाजन यांना नुकतेच राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातून एकूण ४० जणांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर सत्कार समारंभाला महापौर जयश्री महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी पाटील, राजनंदिनी संस्थाध्यक्षा संदीपा वाघ, ज्ञानेश्वर वाघ, ग.स. संचालक आदींची उपस्थिती होती.

शिक्षक राकेश महाजन यांनी आपल्या एकोणवीस वर्षांच्या सेवेत विदयार्थांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. ते प्रत्येक महापुरुषाची जयंती – पुण्यतिथी , विविध दिनविशेष शाळेत आवर्जुन साजरे करतात. वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, गायन व नृत्य स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन यासाठी विदयार्थ्यांची तयारी करुन घेतात. विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर स्वतः नाटकांचे लेखन करतात व विदयार्थ्यांची तयारी घेऊन ती नाटके गावात, शाळेत सादर करतात. नाटक, कथा लेखनाबरोबर ते कविता लेखन देखील करतात.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व शिष्यवृत्ती परीक्षा याबाबत केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध वेळा तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे . शिक्षक राकेश महाजन यांनी स्वतः १९ वेळेस रक्तदान केले असून ते रक्तदान शिबीर आयोजनास सहकार्य करीत असतात . त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असून या कार्यासाठी ते इतरांनाही प्रेरीत करीत असतात . त्यांचा शैक्षणिक कार्याप्रमाणेच सामाजिक कार्यात देखील सक्रीय सहभाग असतो. माळी समाजाच्या राज्यस्तरीय अनिष्ट चालीरिती व व्यसनमुक्ती समितीमार्फत महिन्यातून किमान एका गावाला भेट देऊन रात्रीच्या वेळी समाजबांधवांची सभा घेतात व सदर सभेत ते समाजातील अनिष्ट चालीरिती व व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करतात .

शिक्षक राकेश महाजन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी क्रियाशील शिक्षक पुरस्कार , महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार , कर्तृत्ववान उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, काव्ययात्री पुरस्कार , आश्रमशाळा आदर्श कर्मचारी पुरस्कार असे एकूण सात पुरस्कार मिळालेले आहेत .

नुकतेच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक राकेश महाजन यांचे मनवेल आश्रमशाळा संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील, उपाध्यक्ष बी.एल.देशमुख , सचिव मीराताई पाटील, सहसचिव यादवराव पाटील, खजिनदार अ‍ॅड.ललित पाटील, सभासद देवीदास पाटील, मंगलराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे, माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील, अधीक्षक वसंत पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .

Exit mobile version