Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सक्तिची फी वसुल करू नये

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सक्तीची फी वसुली करू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या संदर्भात मनसेतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असुन त्याबाबत अनिश्‍चितता आहे. अनेक खाजगी कारखाने बंद आहेत. रोजगार थांबला आहे, सरकारी कर्मचार्यांचे पगार रखडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यमातील शाळा पालकांकडे फी वसुलीचा तगादा लावत आहे. शाळा बंद असतांना फी आकारणी कितपत योग्य आहे हा मोठा प्रश्‍न उपस्थित होतो. दरम्यान ऑनलाईन शाळा सुरू केली असल्याचे नाटक निव्वळ फी चे पैसे जमा करण्यासाठी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटर नाही म्हणून अँड्रॉईड मोबाईलद्वारे प्रशिक्षण ही चलाखी लहान विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर परीणाम करणारी आहे. याला लगाम बसणे आवश्यक आहे.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की, फी न भरल्यास येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याचे नांव शाळेतून कमी करण्यात येईल अशी धमकी पालकांना दिली जात आहे. शाळा केव्हा सुरू होतील. याबाबत कोरोनाच ठरवू शकेल अशी परिस्थिती आहे. कोरोना महामारी जिल्ह्यात त्यातही शहरात वेगाने वाढत आहे. जनता हवालदिल आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन फी वसुलीची भुमिका चोखपणे बजावत आहे, ही गंभीर बाब आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी याबाबत पुढाकार घेतला असून असंख्य इंग्रजी माध्यमाच्या शाळा सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. मात्र जळगांव जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचा मनमानी कारभार सुरू आहे. हे तात्काळ न थांबल्यास मनसे पालक व विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून अशा शाळांच्या व्यवस्थापनाविरूद्ध जोरदार आंदोलन करेल. या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना सक्तीची फी वसुली न करणेबाबत तातडीने आदेश काढावा व फी भरली नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांचे नांव काढले जाणार नाही याची पालकांना खात्री करून द्यावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.

या निवेदनावर माजी आमदार तथा मनसे नेते अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर; अनिल वानखडे, माजी जिल्हाध्यक्ष, अ‍ॅड जमील देशपांडे (जिल्हा सचिव); अनिल वाघ- (उपजिल्हाध्यक्ष); विलास बडगुजर, तालुका सचिव(चाळीसगाव); विनोद पाठक-शहर अध्यक्ष भुसावळ,रीना साळवी (भुसावळ); चेतन आढळकर, संजय ननावरे (यावल); विनोद शिंदे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, राजेंद्र निकम,(रस्ते आस्थापना,जिल्हाध्यक्ष); विशाल सोनार,(एरंडोल) कल्पेश पवार,कल्पेश खैरनार(सोशल मीडिया) अविनाश पाटील,संदीप पाटील, संदीप मांडोळे,रज्जाक सैयद, सलीम कुरेशी, योगेश पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Exit mobile version