Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनोहर राणे यांच्या पुस्तकांचे उद्या प्रकाशन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम विधीज्ज्ञ ऍड. संजय राणे आणि उद्योजक किरण राणे यांचे वडिल मनोहर देवचंद राणे यांनी अथक अभ्यास व अनुभवाच्या जोरावर लिहिलेल्या अधात्म व धार्मिक विषयावरील भगवत्प्रणित जीवनरेखा व म्हातार्‍यांनो आनंदात जगा व सुखाने निरोप घ्या या दोन पुस्तकांचे प्रकाशन उद्या सायंकाळी साडेपाच वाजता मायादेवी नगर येथील रोटरी भवनात होणार आहे.

मनोहर राणे हे इंग्रजीचे शिक्षक होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गीतेतील काही श्लोकांचे मराठीत निरूपणाचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे अध्यात्म व धार्मिक विषयात वाचन वाढले. संतांचे लेखन त्यांनी वाचले. यातूनच गीतेतील काही निवडक श्लोक व संत वचने या विषयावर राणे यांनी मराठीत लेखन केले. तेच लेखन भगवद्गीतेतील काही श्लोकांचे सोप्या मराठीत निरूपण करणारे ’भगवत्प्रणित जीवनरेखा’ तर दुसरे पुस्तक ’म्हातार्‍यांनो आनंदात जगा आणि सुखाने निरोप घ्या’ या पुस्तकात वृद्धांना आनंददायी जगण्याचा मार्ग दाखवत. भारतीय पिढीजात कुटुंब व्यवस्थेत मानवी आश्रमाचे स्पष्टीकरण देत वृद्धांनी निवास, आरोग्य, भोजन, रग – द्वेष, स्वावलंबन, कुटुंब आणि अध्यात्मिक बैठक याविषयी सुटसुटीत माहिती दिली आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जळगाव पीपल्स को-ऑप.बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व ज्येष्ठ साहित्यिक व.पु.होले यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शहरातील पुस्तक व वाचनप्रिय नागरिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रकाशक ऍड. संजय राणे व समस्त राणे परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version