Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ड्रग्ज प्रकरणात मनीष भंगाळेची एंट्री ! : पाच लाखांची ऑफर दिल्याचा दावा

मुंबई प्रतिनिधी | सध्या गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात कथित हॅकर मनीष भंगाळे याने आपल्याला डाटा हॅक करण्यासाठी पाच लाख रूपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. भंगाळे यानेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर त्याला कारागृहाची हवा देखील खावी लागली होती.

कथित इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने आज ड्रग्ज प्रकरणात आपल्याला पाच लाख रूपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला आहे. याबाबत टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, मनीष भंगाळे याला भेटण्यासाठी जळगावला ६ ऑक्टोबरला आलोक जैन आणि शैलेश चौधरी असे दोन जण आले होते. त्यांनी सीडीआरचं काम सांगितलं. त्याने काही नंबर सांगितलं. त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होतं. त्यांच्याकडे आणखी काही नंबर होते. तसेच त्यांनी आपल्याकडे एक व्हाट्सऍपचॅट आहे. ते मॉडीफाय करुन टाका, आम्ही जे कंटेट सांगू ते टाका, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मोबाईलमध्ये जी फाईल या संदर्भातील होती ती आर्यन खान व्हॉट्सऍप चॅट या नावाने होती. त्यांनी प्रभाकर साईल नावाचे डमी सीमकार्ड काढून देण्यास सांगितला. तसेच यासाठी पाच लाख देऊ असं सांगितलं.

मनीष भंगाळे पुढे म्हणाला की, त्यांनी मला खूप आमीषे दाखविली. त्यांनी मला दहा हजार रुपये दिले. मी ते घेऊन निघून आलो. मी त्यांचे नंबर ट्रू कॉलरला चेक केलं तर सॅम डिसूजा म्हणून दिसलं. याबाबत मी मुंबई पोलिसांना, केंद्रीय गृहमंत्रालय तसेच महाराष्ट्र गृहमंत्रालयाला पाठवले असल्याची प्रतिक्रिया मनीष भंगाळे याने दिली आहे.

मनीष भंगाळे याने २०१६ साली मे महिन्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पत्नीने बोलणे केल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. मात्र यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली होती. यानंतर मध्यंतरी जळगाव येथे डाटा हॅक करून देण्याच्या प्रकरणात देखील त्याने ऐन वेळेस पोलीसांना माहिती दिली होती. तर आता ड्रग्ज प्रकरणातही त्याची एंट्री झाल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version