Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पिक विमाबाबत जनजागृती रथयात्रेस प्रारंभ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आज ‘मंगळग्रह पिक विमा जनजागृती रथ’ मंदिरातून रवाना झाला आहे. १० दिवसांत तालुक्यातील १५४ गावांमध्ये हा रथ तालुक्यातील ग्रामीण भागात पिक विमाबाबत जनजागृती करणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले आणि तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी अजयसिंग पाटील यांनी रथाचे विधिवत पूजन केले. संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी व कृषी विभागाचे दीपक चौधरी यांनी श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा भगवा ध्वज दाखवून रथाला चालना दिली. रथाची काही अंतरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ तथा मार्गदर्शनार्थ अनेकविध कार्यक्रम राबविले जातात. हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे.

पीक विमा विषयी अजूनही शेतकऱ्यांमध्ये फारसा जनजागर नाही. पीक विम्याच्या फायद्यांबाबत त्यांना फारशी माहिती नाही. शेतकऱ्यांना ही माहिती व्हावी. दुर्दैवाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना त्याची भरपाई मिळावी. यासाठी जनसेवार्थ हा रथ रवाना झाला आहे. साऊंड सिस्टिमवरील रेकॉर्डेड माहिती, बॅनर व पॉम्प्लेटच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी विभाग यासाठी संस्थेला सहकार्य करीत आहे.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सेवेकरी विनोद कदम, संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, कृषी कार्यालयाचे कर्मचारी नवल पाटील आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी यांनी रथासाठी त्यांचे वाहन उपलब्ध करून दिले आहे. मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी पौराहित्य केले.

Exit mobile version