Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

Kapus 4

( प्रतिकात्मक छायाचित्र )

जळगाव प्रतिनिधी । विदर्भातील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चर्चेनुसार ऑक्टोंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपर्यंत होता. परंतु त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तो १५ ते २० टक्के झाला. यासाठी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे, 

नोव्हेंबर महिन्यातील वातावरण गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सद्यपरिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या एक किंवा दोन वेचण्या झालेल्या आहे. काही ठिकाणी कापसाच्या झाडाला 10 ते 15 बोंडया तर कुठे 50 ते 60 बोंडया आहेत. ज्याठिकाणी कापसाला कमी बोंडे असुन बोंड पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. अशा ठिकाणी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन फवारणीचा निर्णय घ्यावा. पण ज्या ठिकाणी बोंडांची संख्या जास्त आहे व बोंडे हिरवी आहेत अशा ठिकाणी खालीलप्रमाणे उपाय योजावे.

प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंड तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व अळ्याची संख्या मोजून ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढरक्या रंगाच्या लहान अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खाली सांगितल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी, जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्कयां दरम्यान आहे अशा ठिकाणी सायपरमेथ्रिन 10 टक्के ईसी 8 मिली किंवा सायपरमेथ्रिन 25 ईसी 3.5 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 ईसी 10 मिली किंवा डेल्टामेथ्रिन 2.8 ईसी 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे, अशाठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के +डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के+ॲसीटामाप्रिड 7.7 टक्के 10 मिली किंवा सायपरमेथ्रिन 10 टक्के+ इंडोक्झाकार्ब 10 टक्के डब्ल्यु/ डब्ल्यु एससी 12 मिली. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

सद्यपरिस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशीचे पिक चार ते पाच फुट उंचीचे असुन त्याच्या फांद्याहि दाटलेल्या आहेत, अशा परिस्थितीत किटकनाशकाची फवारणी करतांना विषबाधा होऊ शकते म्हणुन कपाशीवर फवारणी करतांना कटाक्षाणे फवारणी किटचा वापर करुनच फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना सकाळी व वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. 

सर्वेक्षण करतांना बोंडामध्ये गडद गुलाबी रंगाची तिसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी दिसुन आल्यास हि अळी तीन ते चार दिवसात कोष अवस्थेत जावून पुढील 10 ते 15 दिवसांनी कोषातील पतंग निघुन अंडे टाकण्यास सुरुवात करु शकतात व गुलाबी बोंड अळीच्या दुसऱ्या पिढीच्या प्रादुर्भावास सुरुवात होऊ शकते. अशाठिकाणी वरीलप्रमाणे किटकनाशकाची फवारणी करुन पतंगाच्या व्यवस्थापनासाठी फेरोमोन सापळयांचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. असे विभागप्रमुख, किटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Exit mobile version