चाळीसगाव ते औरंगाबाद रेल्वे मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करा- खा. पाटील यांची लोकसभेत मागणी

जळगाव प्रतिनिधी । प्रस्तावित चाळीसगाव ते औरंगाबाद रेल्वे मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करा अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी लोकसभेत केली आहे.

चाळीसगाव ते औरंगाबाद रेल्वे मार्ग सुमारे ९३ किलोमीटर इतका लांब असून २०१७/१८ या वर्षी या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.१६९० कोटी रुपये खर्चून रेल्वे मार्ग साकारला जाणार होता.मात्र या योजनेसाठी लागणार्‍या निधीच्या परतीचा दराबाबत रेल्वे प्रशासनाने नकारात्मक अहवाल दिल्याने संबंधीत रेल्वे मार्ग प्रस्तावास स्थगिती दिली होती. या अनुषंगाने खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात नियम३७७ च्या अंतर्गत हा मुद्दा त्यांनी अधिवेशनात मांडला असून औरंगाबाद – चाळीसगाव रेल्वे मार्ग याचे पुन्हा सर्वेक्षण करावे अशी मागणी केली आहे

विकासासोबत दळणवळणास चालना

महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासात मदत करणार्‍या व जागतिक वारसास्थळ असणार्‍या अजिंठा-वेरुळ या ऐतिहासिक पर्यटनस्थळांना जोडणे शक्य होईल. यासाठी रेल्वे मार्ग लवकर व्हावा यासाठी पुन्हा सर्वेक्षण करा अशी जोरदार मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी लोकसभेत केली आहे.

खान्देशास अधिक फायदे

औरंगाबाद ते चाळीसगाव हा रेल्वे मार्ग सुमारे नव्वद किलोमीटरचा आहे. वास्तविक सध्या चाळीसगाव येथून मनमाड मार्गे औरंगाबाद जाताना एकशे तीस किलोमीटरचे अंतर रेल्वे प्रवास करावा लागतो.मात्र नव्या रेलवे मार्गात चाळीसगाव ते औरंगाबाद हे अंतर अवघे नव्वद किलोमीटर राहणार आहे. यामुळे पन्नास किलोमीटर अंतर कमी होणार आहे. या रेल्वे मार्गावर चाळीसगाव रांजणगाव, पाथर्डी, कन्नड बोगदा, बहिरगाव, टापरगाव, देवाळाणा, वरझडी , दौलताबाद, औरंगाबाद असे रेल्वे थांबे नियोजित असून या रेल्वेमार्गात अकरा किलोमीटरचा बोगदा असल्याचे या आधीच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे

खासदार उन्मेषदादांचा पाठपुरावा

चाळीसगाव औरंगाबाद रेल्वेमार्गाची घोषणा झाल्यापासून हा प्रस्ताव तातडीने प्रत्यक्ष मार्गी लागावा यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांचा भक्कम पाठपुरावा सुरू आहे. हा रेल्वे मार्ग मतदारसंघातून प्रस्तावित असलेल्या असल्याने खासदार पाटील यांनी यासंदर्भात जोरदार पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. या रेल्वे मार्गामुळे धोरणात्मक आणि आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मोठे योगदान राहणार आहे. योग्य नियोजन व उपयोग केल्यास रेल्वे प्रशासनाला मोठा महसूल मिळणार आहे. या औरंगाबाद — चाळीसगाव अंतर फक्त तासाभराचे राहणार असून उत्तर भारतातील मालवाहतूक चाळीसगाव मार्गे थेट औरंगाबाद पर्यंत जाणार असल्याने चाळीसगाव तालुक्याच्या पर्यायाने जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लागणार आहे. तसेच मनमाड रेल्वे स्टेशनवर होणारी रेल्वेची गर्दी कमी होऊन औरंगाबाद रेल्वे मार्ग झाल्यास मोठी रेल्वे प्रवाशी आणि माल वाहतूक चाळीसगावहून औरंगाबादकडे वळणार आहे. त्याच प्रमाणे बिकानेर दिल्ली तसे अन्य मार्गाची रेल्वे सेवा ही चाळीसगाव मार्गे औरंगाबाद येथे जाणार असल्याने या प्रस्तावित चाळीसगाव औरंगाबाद रेल्वेमार्गाची मोठी प्रतीक्षा परिसरात असून खासदार पाटील यांनी या मार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची मागणी केल्याने चाळीसगाव औरंगाबाद रेल्वे मार्ग लवकरच साकारला जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content