Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठ, महाविद्यालयांचे फलक मराठीत करा – युवासेनेची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना देण्यात आले.

युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात येतील त्याबाबत लवकरच पत्रक काढण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी उपस्थित युवासैनिकांना दिले.

मा. शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खाजगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, असा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे. मात्र विद्यापीठाच्या पातळीवर असे होताना दिसून येत नाही. विद्यापीठातील सर्व अधि विभागांची नावे ठळक अक्षरात मराठीत करण्यात यावीत. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत. विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे. अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली.

महोदय, आपणास माहित आहेच की, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी भाषेला चालना मिळावी यासाठी आपल्या विद्यापीठाची स्थापना 15 ऑगस्ट 1990 रोजी करण्यात आली होती. मात्र स्थापनेनंतर आजपर्यंत हा उद्देश पूर्ण झाला नाही, किंबहूना त्यासाठी फारसे प्रयत्नही केले गेले नाहीत. विद्यापीठात जगातील अन्य भाषा शिकता येतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण, आपल्या मातृभाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष सुरू आहे. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भाषा भवन स्थापन करण्यात यावे.

यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, जितेंद्र बारी, अमित जगताप, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, गिरीष सपकाळे, भुषण सोनवणे, अमोल मोरे, प्रितम शिंदे, विद्यापीठ युवाधिकारी अनिकेत पाटील, ॲङ अभिजीत रंधे, यश सोनवणे, मयूर रंधे, सागर पाटील, ध्रृवा पाटील, पुष्पक सुर्यवंशी आदि युवासैनिक उपस्थित होते.

Exit mobile version