Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझं जे ऐकायचं ते ऐका ! : संजय राऊतांनी ठणकावले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपला फोन टॅप होत असल्याचे मला आधीच माहित आहे. आता सुध्दा फोन टॅप होत असला तरी आपण घाबरत नाही. माझं जे ऐकायचं ते ऐका अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत आणि एकनाथराव खडसे या दोन नेत्यांच्या फोन टॅपींग प्रकरणी कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर राऊत यांनी खास त्यांच्या शैलीत हल्लाबोल केला आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले होते. त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती. काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे, महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते, असा टोला राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, निवडणुकीनंतर ज्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी ही फोन टॅपिंग झाले. आम्ही कुणाशी बोलतो, कुणाला भेटतो, काय करतो ही माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कुणाला देत होते हे सर्वांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

त्यांना एखाद्या राज्यात सत्ता आणायची असेल तर राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा यातून राजकारण केलं जातं. हे सर्व वापरून तुमची सत्ता येत नसेल तर केबीजी आणि सीआयएही आणा, असा खोचक सल्ला त्यांनी दिला. गोव्यात भाजप सत्तेत येणार नाही. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगतोय. फोन टॅपिंग ही त्यांची पूर्व तयारी आहे. त्यांनी या पूर्वी महाराष्ट्रातही अशा प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. इतर राज्यातही करतील. पण त्यांना यश मिळणार नाही, असंही ते म्हणाले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा माझे फोन आताही टॅप करत आहे. पण मी माझा नंबर बदलेला नाही. तोच आहे आणि तोच फोन मी वापरतो. माझं जे काही ऐकायचं आहे, ते त्यांना ऐकू द्या, असंही ते म्हणाले.

Exit mobile version