Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेडीसीसीत महाविकास आघाडीचा भाजपला धक्का : तीन उमेदवार बिनविरोध

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीने सर्व जागांवर तयारी करण्याच्या भाजपच्या दाव्याला धक्का देण्याचे काम केले आहे.

आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तीन वाजेपर्यंत धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली असून याबाबत नंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

दरम्यान, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आजच भाजपने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा केल्यानंतर एका तासातच महाविकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

दरम्यान, संजय पवार, अमोल पाटील आणि चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाल्यानंतर जिल्हा बँकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संजय पवार, अमोल पाटील, विजय भास्कर पाटील, ज्ञानेश्‍वर महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version