Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडीची राज्यव्यापी बंदची हाक

मुंबई प्रतिनिधी | उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत  ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळला जाणार असल्याची घोषणा केली. जयंत पाटील म्हणाले, आम्ही लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराविरोधात ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरला शेतकर्‍यांना चिरडून मारण्याची जी घटना घडली त्याचा महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ११ ऑक्टोबरला बंद करत आहोत. मंत्रिमंडळाने देखील याबाबत खेद व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळाने मृत झालेल्या शेतकर्‍यांना आदरांजली वाहिली आहे.

उत्तर प्रदेश सरकार शेतकर्‍यांवर अत्याचार करणार्‍या व्यक्तीला बेमुर्वतखोरपणे मोकळं सोडतंय. त्याचाही निषेध आवश्यक आहे. म्हणून ११ ऑक्टोबरला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि आघाडीतील मित्रपक्षांच्या वतीने हा बंद पुकारत आहोत, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील. यात रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल. आघाडीच्या वतीने हा निर्णय हा घोषित करण्यात येतोय. हा बंद सरकार म्हणून नसेल. मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने या बंदची घोषणा करत आहोत. पक्षाच्या वतीने हा बंद पुकारण्यात येतोय.

 

Exit mobile version