Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडी एकत्रीतपणे निवडणूक लढणार का ? पवार म्हणतात. . . 

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रीत लढणार की स्वतंत्र ? यावरून संभ्रम असतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र यावर सावध उत्तर दिले आहे.

कोल्हापूर येथे आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर त्यासंदर्भात चौकशी करणार्‍या आयोगानं मला देखील समन्स काढली होतं. त्यावेळी मला विचारण्यात आलं होतं. तेव्हा मी राजद्रोह या कायद्याबाबत बोललो होतो. राजद्रोहाचा कायदा हा ब्रिटिशकालीन १८९० सालचा आहे. एखाद्या प्रश्नबाबत सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा जनतेचा अधिकार आहे, म्हणून या कायद्याबाबत फेर विचार करण्याबाबत मी बोललो होतो. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत असेल तर चांगली गोष्ट आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत अनेक गैरसमज झाले आहेत, असं मला वाटतं. कोर्टानं असं सांगितलंय की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जिथून तयारी केली आहे, तिथून पुढे तयारी करा, असं मला वाटतं. १५ दिवसांत सुरुवात करा, असं कोर्टाने म्हटलंय असं मला वाटतं. मतदान प्रक्रियेला किमान दोन-अडीच महिने लागतील. महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढविण्याबाबत आपल्या पक्षात दोन प्रवाह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या, असं काही जणांचं मत आहे. तर काही जणांनी स्वतंत्र लढावं आणि नंतर एकत्र यावं, असं म्हणतात. याबाबत महाविकास आघाडीमध्ये याबाबत पूर्ण चर्चा झाली नाही असे पवार म्हणाले. सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असून यासंदर्भात आम्हाला कॉंग्रेस आणि शिवसेनेला विचारावं लागेल. एकत्र बसून बोलून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याबाबत विचारल्यावर यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, हा राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जाणार आहे, मला माहित नाही. माझा नातू देखील अयोध्येत आहे, हे मलाही माहीत नव्हत.

Exit mobile version