Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला : परिवहन सेवा बंद

maharashtra karnatak border

कोल्हापूर, वृत्तसंस्था | ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच कर्नाटकात कन्नड वेदिका संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी, वातावरण तापू लागल्याने दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने दक्षतेचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद केली आहे.

 

सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे. उभय राज्यातील प्रवाशी कोल्हापूर, कागल, निपाणी, बेळगाव अशा बस स्थानकांमध्ये अडकले आहेत. दुसरीकडे, दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जात आहे. अशातच, आज बेळगाव येथे चंदगडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अनगोळ येथे आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात दुपारी ३.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा कन्नड वेदिका संघटनेने दिला आहे.

भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी, ‘कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की, आमची माणसे, याचे उदाहरण घालून देऊ,’ असा इशारा दिला होता. याच वादाचे हे पडसाद असलेले दिसत आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी त्याला तसेच करड्या भाषेत प्रत्युत्तर दिले. मात्र आता हा वाद चांगलाच चिघळला असल्याचे दिसत आहे. सीमाप्रश्नाची धग तापल्याचे पाहून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले आहेत. यामुळे उभय राज्यात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची कोंडी झाली आहे. खाजगी, शेअर वाहतुकीचा मार्ग प्रवाशी शोधत आहेत.

मुख्यमंत्र्यांचे पुतळे दहनाची चढाओढ –
सीमाप्रश्नाला उकळी फुटल्यानंतर दोन्ही राज्यातील समर्थक आपली भूमिका मांडत रस्त्यावर उतरत आहेत. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा काल संध्याकाळी जाळण्यात आला. त्याची प्रतिक्रिया लगोलग कोल्हापूर येथे उमटली. युवासेनेने जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे आणि सहकाऱ्यांनी काल रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारो आंदोलन केले. तसेच आज रविवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेकडून बस स्थानकापासून निषेध रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान,चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज बेळगाव येथे आयोजित केला आहे. तो उधळून लावू,असा कन्नड रक्षण वेदिका संघटनेने दिला आहे.

Exit mobile version