Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र या आधी इतका अस्थिर दिसला नाही – छत्रपती शाहूमहाराज

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीच्या महाविकास आघाडीने कोल्हापूर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. नेहमी राजकारणापासून दूर असलेले शाहू महाराज छत्रपती आता महाविकास आघाडीकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी सध्या परिस्थितीबद्दल आपले मत व्यक्त केले. आजपर्यंत महाराष्ट्र कधीच इतका अस्थिर दिसला नाही. एका पक्षाचे दोनतीन पक्ष झाले, अस आजपर्यंत कधी झाले नाही.

पहाटेचा शपथविधी देखील आपण सर्वांनी पाहिला, अशा पध्दतीचे सरकार आपल्याला नको आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही, हा राज्य स्थिर झाला पाहिजे कोणतेही सरकार असो, मात्र ते स्थिर असायला हवे, फोडाफोडी न करता निवडणुकीच्या माध्यमातून सर्व करायला हवे. अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांचे दिल्लीच्या परिसरात आंदोलन सुरू आहे, तर महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने आंदोलन चालूच आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव भेटत नाही. खते देखील महाग झाली आहेत. शेतकऱ्यांना सातत्याने कर्जबाजारी केले जात आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तुम्ही कमकूवत करत आहात. शेतकऱ्यांना पूर्णपणे शासनावर अवलंबून राहण्याची वेळ तुम्ही आणत आहात. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे यावेळी शाहू महाराज छत्रपती म्हणाले. आपला देश हा एकाधिकारशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोप शाहू महाराज छत्रपती यांनी केला आहे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. मात्र तरी देखील आपण एकाधिकारशाहीकडे जात आहोत. मी दिल्ली किंवा मुंबईला न जाता देखील मला उमेदवारी मिळाली आहे. खासदार झाल्यावर शेतकरी, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण आगामी काळात प्रयत्न करणार, या सर्व क्षेत्रात आपण आगामी काळात काम करणार असल्याचे शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले आहे.

Exit mobile version