‘महापोर्टल’ बंद करण्याची मागणी; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

supriya sule news

मुंबई वृत्तसंस्था । शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले ‘महापोर्टल’ बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मागील महायुती सरकारने महापोर्टल सेवा सुरू केली त्यावेळी अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती.

सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शासकीय नोकरभरती करताना पारदर्शकता रहावी, ऑनलाइन अर्ज करता यावा, यासाठी मागील राज्य सरकारने महासेवा पोर्टल सुरू केले होते. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी हजारो इच्छुक उमेदवारांनी केल्या होत्या. राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन झाले होते.

निवडणुकी आधी सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रा काढली होती. त्यावेळी अनेक युवकांनी आपल्याला भेटून महापोर्टल बंद करण्याची मागणी केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. महापोर्टलद्वारे होणाऱ्या नोकरभरतीत पारदर्शकता होत असल्याचा दावाही निराधार असल्याचे युवकांनी आंदोलनादरम्यान म्हटले होते. मागील सरकारने सुरू केलेले हे महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content