Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाकलाउत्सव

6a2902cc e37f 4cbc a021 bfad236e1cd1

चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच दिनांक १० ते १३ जानेवारी दरम्यान महाकला उत्सव या भरगच्च सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे पत्रकार परिषदेत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, सहसचिव तथा प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी सांगितले. पत्रकार परिषद संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

शुक्रवार दि. १० रोजी सकाळी ८ ते १० वाजे दरम्यान महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महाकला उत्सवाचे उद्घाटन चोपडा येथील तहसिलदार अनिल गावीत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक १० रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत माजी आमदार दादासाहेब डॉ. सुरेश पाटील जिल्हास्तरीय कनिष्ठ आंतरमहाविद्यालयीन वकृत्वस्पर्धा, सायंकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान आनंद मेळावा, सायंकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर शनिवार दि. ११ रोजी सकाळी ८ ते १० वाजे दरम्यान शेलापागोटे हा कार्यक्रम होणार आहे. तर सकाळी १० ते ५ वाजे दरम्यान माजी शिक्षण मंत्री स्व.अक्कासाहेब सौ. शरदचंद्रिका सुरेश पाटील राज्यस्तरीय वरिष्ठ आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ४ ते ७ वाजे दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर रविवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० वाजे दरम्यान संगीत शेलापागोटे यांचा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी सकाळी ९ वाजता मॉसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त डॉ. हेमंत नरेंद्र पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ ते ७ वाजे दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच सोमवार दि. १३ रोजी सकाळी ८ ते १० वाजे दरम्यान चित्रकला स्पर्धा, हास्य काव्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, कथाकथन, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व सायंकाळी ४ वाजता समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. तसेच कला,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘रंगबावरी’ ही एकांकिका सादर केली होती त्यास जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार व पुरुषोत्तम करंडक प्राप्त झाला आहे. तसेच या एकांकिकेत बाळू या पात्रास राज्यस्तरीय असा उत्कृष्ठ अभिनय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही एकांकिका ही दि. १३ रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असून सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. संदीपभैय्या पाटील व सचिव डॉ.स्मिता पाटील आणि सहसचिव तथा प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी केले आहे.

Exit mobile version