Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माध्यमिक विद्यामंदिर एरंडोल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माध्यमिक विद्यामंदिर एरंडोल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थाचालक सचिन विसपुते तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवेकानंद केंद्राचे संचालक मा. प्रा.जी. आर. महाजन सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण हे उपस्थित होते. प्रा.जी. आर. महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आलं तर खचू नका, कोलमडू नका, पुन्हा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल तसेच स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची किंमत कधीही कमी करून घेऊ नका असे सांगितले, तर रमेश भाऊ परदेशी यांनी आवडेल त्या विषयात करिअर करा मात्र जिथे जाल तिथे कष्ट करा आपले व आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करा असे प्रतिपादन केले.

सचिन विसपुते यांनी मोबाईल टीव्ही यासारख्या माध्यमांपासून दूर राहण्यास तसेच चांगल्या मित्रांची संगत धरण्यास सांगितले. दहावीनंतर असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे प्रत्येकालाच नोकरी मिळेल असे नाही शेती सारखा व्यवसाय जरी करायचा असल्यास तो उत्तम प्रकारे करा असे सांगितले.

आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी सूचना दिल्या व उज्वल भवितव्याबद्दल शुभेच्छा दिल्यात. दहावीचे वर्गशिक्षक हितेंद्र पाटील सर यांनी विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आणलेल्या सराव परीक्षेबाबत माहिती दिली तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे सुवाच्य अक्षर काढून वेळेत पेपर पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्यात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पाटील व राधिका पाटील हिने केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी भावनाविवश झाले होते.कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उर्वशी पाटील हिने केले.

Exit mobile version