Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्हा बँक पंचवीस वर्ष ताब्यात घेणार – गुलाबराव देवकर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सुतगिरणीची विक्री व मधुकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा जिल्हा बँक पंचवीस वर्षांसाठी घेणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी सांगितले. तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांचे अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे गटसचिव यांच्या संयुक्त विद्‌माने अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या सत्काराचा कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

जळगाव जिल्हा बँकेत सध्या पिककर्जाचा एनपीए ४२ टक्के असून इतर कर्जाचा ८ टक्के आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असली तरी केवळ एनपीएमुळे आपला ऑडीट वर्ग “ब “आहे. त्याला “अ” मध्ये आणण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने वसुलीच्या संदर्भात कठोर निर्णय घेतले आहेत. यात यावल येथील जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणीकडे सुमारे १० ते १२ कोटी रुपये अडकून पडले आहेत. गिरणी दहा- बारा वर्षापासून बंद पडून असल्यामुळे मशिनरी खराब झाली. त्यामुळे कोणी गिरणी चालविण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे गिरणी विक्रीसंदर्भात निर्णय झाला असून येणाऱ्या काळात गिरणी विक्रीचे टेंडर निघेल. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आज येथे दिली.

तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांचे अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे गटसचिव यांच्या संयुक्त विद्‌माने अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्हा बँकेच्या येथील शाखेत पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, संचालक विनोद पाटील, बाजार समितीचे सभापती तुषार पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय पाटील व आदी मान्यवर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, संचालक विनोद पाटील यांचा सत्कार विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकचे अध्यक्ष गुलाबराव देवकर म्हणाले की, गेल्या चार – पाच वर्षांपासून अडचणीत असलेला यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्हा बँक ताब्यात घेऊन पंचविस वर्ष भाडे कराराने चालविण्यास देईल. यातून दरवर्षी किमान पाच, सहा कोटी रुपये जिल्हा बँकेस वसूल मिळेल. पंधरा वर्षात संपूर्ण वसूल मिळाल्यानंतर उर्वरीत कालावधीचे पेमेंट कारखान्यचे संचालक मंडळास दिले जाईल. व भाडेकरारनामा संपल्यानंतर कारखाना संचालक मंडळाचे ताब्यात देण्यात येईल असे नियोजन असल्याचे अध्यक्ष देवकर म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव विजयसिंग पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बँकेच्या विभागीय शाखेचे व्यवस्थापक अनिल महाजन, शाखा व्यवस्थापक विनोद देशमुख, सुधिर भंगाळे, गणेश बुरुजवाले यांचेसह सेवक वर्गाचे सहकार्य लाभले.

 

 

Exit mobile version