मसाका भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँकेने ताब्यात घेतलेला मधुकर सहकारी साखर कारखाना अर्थात मसाका भाड्याने देण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

थकीत कर्जामुळे फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना (मसाका) आणि कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना (वसाका) हे दोन्ही कारखाने जिल्हा बँकेने ताब्यात घेतले आहेत. या कारखान्यांचे नेमके काय भवितव्य असेल याबाबत संभ्रमाचे वातावरण असतांना जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखालील संचालकांच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यानुसार, मसाका हा भाडेतत्वावर देण्यात येणार असून याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तर, वसाकाच्या विक्रीवर स्थगिती असून ती उठविण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यासोबत या बैठकीत शेतकर्‍यांना २५ टक्के ऐवजी ५० टक्के रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या १५ दिवसांत स्वत:चे १०० एटीएम मशीन बसवण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. तसेच, जिल्हा बँकेकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर, मुक्ताई सूतगिरणीला ३० कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले.

या बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, ज्येष्ठ संचालक एकनाथ खडसे, संजय पवार, डॉ. सतीश पाटील, महापौर जयश्री महाजन, घन:श्याम अग्रवाल, अमोल पाटील, प्रताप हरी पाटील, मेहताबसिंग नाईक, शैलजा निकम या संचालकांसह बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.

Protected Content