Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माढा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही – शरद पवार

sharad pawar

 

पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार लोकसभा संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केलाय. मी माढ्यातून निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह आहे. मात्र पक्षाने अद्याप माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. एकाच कुटुंबातील किती लोकांनी निवडणूक लढवावी? त्यामुळे कौटुंबिक पातळीवर माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

 

कुटुंबातही मी चर्चा केली. मी स्वतः उभे न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील. नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे. एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभे रहावे याला काही मर्यादा असाव्यात असे मला वाटते. त्यामुळे मी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आमची यादी अजून नक्की व्हायची आहे. यादी नक्की झाली की तुम्हाला कुठून कोण लढेल हे तुम्हाला सांगितले जाईल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही होत आहे. त्याबाबतही आम्ही विचार करत आहोत, असेही पवारांनी नमूद केले.

 

दरम्यान, माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटलांना डावलल्यामुळे माढा लोकसभेतल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जातं होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात माढ्याबाबत पुनर्विचार सुरु असल्याची चर्चा होती. या जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठकही पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. विजयसिंह मोहिते पाटील यांनाच माढ्यातून उमेदवारी दिली जाईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल तो तुम्हाला कळवला जाईल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. मी आत्तापर्यंत चौदावेळा निवडणूक लढवली आहे एकदाही हरलेलो नाही. त्यामुळे या निवडणुकीला घाबरून मी माघार घेतलेली नाही असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Exit mobile version